लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लस न घेता दुकान सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा पवित्रा जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मनपा प्रशासनाने घेतल्यानंतर सोमवारी व्यापाऱ्यांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला. शहरातील लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७५० जणांचे लसीकरण झाले.
जिल्ह्यात लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पुढाकार घेत लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अंतर्गत महानगरपालिकेने ‘एक दिवस एक प्रभाग’ ही मोहीम सुरू केली. मात्र, तरीही लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने रविवारी जिल्हाधिकारी गोयल यांनी रस्त्यावर उतरुन बाजारपेठ भागात फिरुन लस न घेता दुकान सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली होती. तसेच यापुढे लस न घेता दुकान सुरू ठेवल्यास ५ हजार रुपयांचा दंड करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. रविवारी दिवसभर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मनपा आयुक्त देविदास पवार आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी बाजारपेठेत तपासणी केली.
सोमवारीदेखील ही मोहीम सुरू ठेवण्यात आली. आयुक्त देविदास पवार यांनी गांधी पार्क, जनता मार्केट, मटन मार्केट, जुना मोंढा, कोठारी कॉम्प्लेक्स, सुभाष रोड, अपना कॉर्नर, शनिवार बाजार, नानलपेठ कॉर्नर परिसरातील आस्थापनांची तपासणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, माजी नगरसेवक विखार अहेमद खान, व्यापारी सलीम कच्छी आदी उपस्थित होते. या पथकात सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख, युसुफ जई, मो. अ. मुक्तसीद खान, नानलपेठ पोलीस कर्मचारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक करूण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक मेहराज अहेमद, विकास रत्नपारखे, श्रीकांत कुरा, अब्दुल शादाब, लक्ष्मण जोगदंड, जाकेर मौलाना, मोहम्मद अथर, राजकुमार जाधव आदींचा समावेश होता.
२० हजारांचा दंड वसूल
यावेळी व्यापाऱ्यांनी लस न घेता सुरू ठेवलेली दुकाने बंद करण्यात आली. तसेच मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून १ हजार ७०० रुपये तर लस न घेता दुकान सुरू ठेवणाऱ्या ४ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार याप्रमाणे २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद
मनपाच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला असून, कोठारी कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, बडोदा बँकेजवळ, उद्देश्वर विद्यालय व वडगल्ली येथील लसीकरण केंद्रांवर ७५०पेक्षा अधिक व्यापारी, नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.