परभणी : रिक्षा पासिंग करून फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी मोटर वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून खासगी इसमाने तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी ताडकळस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक याच्यासह खासगी इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. ही कारवाई अहिल्यानगर येथील एसीबीच्या पथकाने केली.
संतोष नंदकुमार डुकरे मोटार वाहन निरीक्षक वर्ग एक असे लाच प्रकरणातील लोकसेवकाचे नाव आहे. आरटीओ कार्यालय असोला येथे मोटार व परिवहन निरीक्षक संतोष डुकरे कार्यरत आहेत. तक्रारदार हे रिक्षा चालक असून त्यांची रिक्षा पासिंग करून फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासाठी खासगी इसम मुंजा मोहिते याने पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती. डुकरे यांनी तक्रारदार यास खाजगी इसम मुंजा यांना भेटण्यासाठी इशाराद्वारे सांगून रिक्षाच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यास खासगी इसम मुंजा यास प्रोत्साहन दिले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परभणी येथे अहिल्यानगर येथील एसीबी पथक शुक्रवारी दाखल झाले होते. त्यानंतर खासगी इसम मुंजा मोहिते यांनी मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासाठी पंचासमक्ष पाचशे रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध ताडकळस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे, सापळा पथक हरून शेख, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड यांनी केली. तपास पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर करीत आहेत.