प्रमोद साळवे/गंगाखेड (जि.परभणी) : चार पाणंद रस्त्याच्या कामासाठी आरोपी लोकसेवक पोलीस पाटलाने दीड लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ५० हजार रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली. शुक्रवारी पंचासमक्ष झालेल्या एसीबीच्या सापळा कारवाईत आरोपी लोकसेवकाने मागितलेली लाच तक्रारदार यांच्याकडून दुसरा आरोपी खासगी इसमाने ५० हजार स्विकारले. लाचखोर दोघांना एसीबीने ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे.
रामेश्वर बचाटे पोलीस पाटील, वडगाव स्टेशन, ता.सोनपेठ आणि वैजनाथ बचाटे रा.वडगाव स्टेशन खासगी इसम अशी दोन आरोपी लोकसेवकांची नावे आहेत. तक्रारदाराच्या गावी ग्रामपंचायतकडून चार पाणंद रस्त्याचे काम सुरू आहे. तक्रारदाराकडे असलेल्या हायवा ट्रक व त्यांच्या मामाकडील जेसीबीने ते दोघे मुरूम व विहिरीतून आणलेला पाषाण दगड रस्त्यावर टाकण्याचे काम करीत आहेत. २१ मार्चला पोलीस पाटील रामेश्वर बचाटे हे तक्रारदारांना भेटून म्हणाले, तुमचे हायवा आणि जेसीबीने तुम्ही दोघे गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करीत आहात, तुम्ही मला प्रत्येकी पाच हजारप्रमाणे दोघांचे दहा हजार दर दिवशी द्या नाही तर ही माहिती मी पोलीस ठाणे, तहसीलला देईल.
त्यामुळे तुमच्यावर गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल होईल. तक्रारदार यांनी २३ मार्चला परभणीच्या एसीबी कार्यालयात तक्रार दिली. यानंतर पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत लोकसेवक रामेश्वर बचाटे याने चार रस्त्याच्या कामासाठी दीड लाखाची मागणी करून तडजोडीत प्रथम ५० हजार व नंतर ७५ हजार अशी एक लाख २५ हजाराची मागणी केली. लाच रक्कम खासगी इसम वैजनाथ बचाटे याच्याकडे देण्यास सांगून लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
दरम्यान, शुक्रवारी पंचासमक्षच्या सापळा कारवाईत वैजनाथ बचाटे याने तक्रारदाराकडून लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता ५० हजार स्वीकारला. आरोपी वैजनाथ बचाटे व लोकसेवक रामेश्वर बचाटे यास ताब्यात घेण्यात आले. यशस्वी सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलानी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार, नामदेव आदमे, राम घुले, कल्याण नागरगोजे, कदम नरवाडे यांनी केली.अंग झडतीत आढळले मोबाईल
आरोपी लोकसेवक रामेश्वर बचाटे याच्या अंगझडतीत एक मोबाईल तर आरोपी लोकसेवक वैजनाथ बचाटे याच्या अंगझडतीत लाचेची रक्कम ५० हजार व एक मोबाईल आढळला. आरोपी लोकसेवकाच्या निवासस्थानाची घर झडती सुरू आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गंगाखेड ठाण्यात गुन्हा नोंद करणे प्रक्रिया सुरू आहे.