पालम : तालुक्यात ग्रामीण भागात गावस्तरावर विकास कामांसाठी १५ वा वित्त आयोग अंतर्गत ३ कोटी रुपयांचा निधी तीन महिन्यापूर्वी आलेला आहे. हा निधी खर्च करण्यासाठी आराखडा बनविला जात असून विकास कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
पालम तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यापैकी १३ ग्रामपंचायतीवर सरपंच आहेत. तर ५३ ग्रामपंचायतीवर कालावधी संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रशासकांच्या नियुक्त होताच दोन टप्यात ३ कोटी ९२ लाखाचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाला होता; परंतु, गावातील राजकारणाचा फटका बसू नये, या कारणाने प्रशासक निधी खर्च करण्यास टाळाटाळ करीत होते. गावाचे आराखडे, निधी पडून होता याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. अखेर गटविकास अधिकार आर. व्ही. चकोर यांनी प्रशासक व कर्मचारी यांना तंबी देत आराखडे बनविण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. त्यामुळे गावोगाव आराखडे तयार केल्या जात आहेत. ५० टक्के बंदिस्त व ५० टक्के अबंदिस्त कामावर निधी खर्च केला जाणार असून पाणी पुरवठा व नळ जोडणी कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.