लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन एक महिना उलटला असला तरी या इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. उद्घाटनाचा सोपस्कार पूर्ण करून रुग्णसेवेसाठी ही इमारती खुली करावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांतून होत आहे.सोनपेठ तालुक्यात ६५ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील रुग्णांच्या उपचारासाठी सोनपेठ शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रावर तालुक्यातील ६५ गावांसह शहरातील रुग्णांचा भार आहे. तर शेळगाव, वडगाव, डिघोळ इ., शिर्शी बु., लासीना, कान्हेगाव, खडका, नरवाडी, आवलगाव, उखळी बु., धामोनी तालुक्यातील या गावात १० उपकेंद्र आहेत. या ठिकाणी रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येतो. मात्र गंभीर रुग्णांना उपाचारासाठी परळी, अंबाजोगाई व परभणी येथे जावे लागते. त्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची मोठी परवड सुरू आहे.सोनपेठ तालुक्यातील रुग्णांसाठी तालुक्याच्या ठिकाणी एक ग्रामीण रुग्णालय व्हावे, या मागणीसाठी येथील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी अनेक वेळा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले. अनेक आंदोलने व सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील नागरिकांची मागणी पूर्ण करून शासनाने सोनपेठ तालुक्यासाठी शहराच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. या रुग्णालयाच्या इमारतीसाठी ३ कोटी ७० लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार काम होऊन सर्वसोयी सुविधायुक्त ग्रामीण रुग्णालयाची इमारत नोव्हेंबर महिन्यात उभारली आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन सोनपेठकरांचे ग्रामीण रुग्णालयाचे स्वप्न प्रशासनाने पूर्ण करणे आवश्यक होते; परंतु, एक महिन्याचा कालावधी उलटला तरी प्रशासनाला अद्यापपर्यंत या इमारतीच्या उद्घाटनासाठी मुहूर्त सापडला नसल्याने तालुक्यातील रुग्ण व नातेवाईकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
परभणी :ग्रामीण रुग्णालय इमारत उद्घाटनास मुहूर्त सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:16 IST