लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतमाल तारण योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी परभणी बाजार समितीने तातडीने गोदाम उपलब्ध करून द्यावे, असे आदेश राज्याच्या पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत़शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम यांनी राज्याच्या पणन संचालकांकडे या संदर्भात २९ नोव्हेंबर रोजी तक्रार केली होती़ या तक्रारीत परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीने तूर खरेदीसाठी गोदाम उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी आदेश देऊन सुद्धा ते उपलब्ध करून दिले नाहीत़ पणन संचालनालयाच्या १२ सप्टेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार शेतमाल तारण योजनेसाठी गोदाम भाडेतत्त्वाने तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असताना बाजार समितीच्या स्वमालकीची गोदामे व्यापाºयांना ११ वर्षांच्या करारावर भाड्याने दिलेली आहेत़ मालाच्या प्रतवारीसाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक, बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर आवक शेतमालाची नोंद, शेतमालाची प्रत सुधारण्यासाठी उपाययोजना आदींबाबत निवेदन देऊनही कारवाई झालेली नाही़ २०१६ मधील जून, जुलै महिन्यातील कांद्याचे अनुदान शेतकºयांना मिळाले नाही़ ६८८ शेतकºयांनी या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करूनही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला नाही़ बाजार समितीकडून शेतकरी भवन व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे़ या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी व्यक्तिश: लक्ष घालून संबंधितांना आवश्यक त्या सूचना देऊन आपल्या स्तरावर कार्यवाही करावी, शासन नियमातील कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात व कुचराई केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी, असेही या संदर्भातील आदेशात पणन संचालक दीपक तावरे यांनी म्हटले आहे़
परभणी : शेतमालासाठी गोदाम उपलब्ध करून देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:49 IST