लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील डोंगरपिंपळा शेतशिवारात असलेल्या गोठ्याला अचानक आग लागल्याने लहान-मोठ्या ११ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.तालुक्यातील डोंगर पिंपळा शेत शिवारात आखाड्यावर राहत असलेल्या विश्वनाथ भाऊराव कवडे यांचे कुटुंबीय शुक्रवारी सकाळी ८ वाजता काही कामानिमित्त गावात गेले होते. शेतात असलेल्या जनावराच्या गोठ्याने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती शेत शेजाऱ्यांनी फोन करुन विश्वनाथ कवडे यांना दिली. कवडे यांच्यासह उपसरपंच प्रल्हादराव कतारे, नामदेव शिंदे, रामदास कवडे, वैजनाथ कुंडगीर आदींनी शेतात धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.रौद्ररुप धारण केलेल्या आगीने जनावरांच्या गोठ्याबरोबर शेत आखाड्यावर असलेल्या घरालाही आपल्या कवेत घेतले. या आगीत एक गाय, तीन शेळ्या, एक बकरा व शेळ्याची ६ पिल्ले दगावली. तर म्हैस, रेडा, वगार, गाय व कुत्रा अशी पाच जनावरे गंभीररित्या जखमी झाली आहेत. त्याच बरोबर तीन हजार कडब्याच्या पेंडा व अन्नधान्य आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.या आगीत अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती आरोग्य अधिकारी व पशूधन अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी असलेल्या जनावरांवर औषधोपचार केले. त्यानंतर तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला.
परभणी : गोठ्याला आग; ११ जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:20 IST