लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कालावधी संपत असल्याने या बँकेच्या निवडणुकीसाठी पूर्व तयारी सुरु करण्यात आली होती. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सुरु केला होता. मात्र महात्मा जोतीराव फुले कर्ज मुक्ती योजनेच्या कामात अडथळा येऊ नये, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी न्यायालयाने मतदार यादीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वीची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.५०२ ठराव उपनिबंधकांकडे प्राप्तपरभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतदार यादी तयार करण्यासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटी, मजूर सहकारी संस्था यासह विविध सहकारी संस्थांकडून ३१ जानेवारीपर्यंत ठराव मागविण्यात आले होते. त्यापैकी ५०२ संस्थांनी हे ठराव उपनिबंधकांकडे सादर केले आहेत. आणखी काही संस्थांनचे ठराव येणे बाकी आहेत.बँकेची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु करा, असे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती मिळाली. मात्र प्रत्यक्षात लेखी आदेश प्राप्त झाला नाही. न्यायालयाच्या निर्णयानुसार ठराव मागविण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. त्यामुळे ठराव घेण्याच्या कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
परभणी जिल्हा बँकेच्या मतदार यादी प्रक्रियेला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:29 IST