लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील सन्मित्र कॉलनी भागात चुकीच्या पद्धतीने आरक्षण केल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांना घेराव घालून आरक्षण उठविण्याची मागणी करण्यात आली.महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या सन्मित्र कॉलनीत नागरी वसाहत आहे़ हा भाग पूर्वी खानापूर शिवारातील सर्वे नंबर १६/१ मधील निवासी प्रयोजनाऐवजी खेळाचे मैदान आणि उद्यानासाठी आरक्षित केलेला होता़ नागरी वसाहत वाढल्यानंतर २२ वर्षापूर्वी नगरपालिकेनेही येथील आरक्षण चुकीच्या पद्धतीने केले आहे़ हा भाग निवासी असताना त्याची कुठलीही शहानिशा न करता खेळाचे मैदान आणि उद्यानासाठी हा परिसर आरक्षित केला़ २२ वर्षापूर्वी झालेले आरक्षण चुकीच्या पद्धतीने झाले असून, आता ते कालबाह्यही झाले आहे़ या भागात नागरी वसाहत वसली आहे़ परंतु, आरक्षणामुळे या ठिकाणी नळ योजना, पथदिवे, रस्ते, नाल्या ही मूलभूत विकासाची कामे करताना अडथळे निर्माण होत आहेत़ काही दिवसांपूर्वीच ठोक तरतूद म्हणून ४५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला़ मात्र आरक्षणाच्या कारणावरून विकास कामे करता येत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला़ सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख, अक्षय देशमुख, विश्वजित बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिकेत आंदोलन केले़ नागरिकांच्या सोयी, सुविधांसाठी सन्मित्र कॉलनीतील आरक्षण उठवून येथील विकास कामांचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली़
परभणी : ग्रीन बेल्ट आरक्षणामुळे विकास कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:49 IST