लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : येथील नगरपंचायतीकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील ५३० घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती नगराध्यक्षा अनिता जालिंदर हत्तीअंबिरे, उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांनी १७ फेब्रुवारी रोजी नगरपंचायतमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.मागील काही दिवसांपासून पात्र लाभार्थ्याकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. हे अर्ज शासनाकडे पाठवून नगरपंचायतीने घरकुलांना मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यानुसार ५३० घरकुलांना मंजुरी मिळाली असून या घराच्या बांधकामास निधी वाटपासाठी शासनाकडून नगरपंचायतीला निधी वर्ग करण्यात आलेला आहे. या निधीतून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे. प्रत्येक घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान नगरपंचायतीकडून दिले जाणार आहे. लवकरच घरकुलाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामुळे शासनाच्या निधीतून अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार अससल्याची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेस नगरसेवक उबेद पठाण, असद पठाण, अजीम पठाण, लाल खाँ पठाण, मोबीन कुरेशी, विजय घोरपडे, सुनील शिरस्कर, गफार कुरेशी, चंद्रकांत ताटे, गजानन रोकडे, शेख अकबर, महमद कुरेशी, मंगेश जोंधळे, विठ्ठल टोम्पे, मुस्तफा शेख आदींची उपस्थिती होती.पालम नगरपंचायतीकडून पहिल्या टप्प्यामध्ये ५३० घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. अजून ४१२ प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आले आहेत. या घरकुलांना नगरपंचायतीकडून परवानगी मिळाली असून राज्यस्तरीय समितीकडे घरकुलाचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. येत्या पंधरा दिवसात या घरकुलांना मंजुरी मिळणार आहे.-अनिता जालिंदर हत्तीअंबिरे, नगराध्यक्षा, पालमनगरपंचायतीकडून ५३० घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. तसेच या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झालेला आहे. लवकरच नोटीस बोर्डवर लाभार्थ्यांची यादी लावण्यात येणार आहे. या यादीतील लाभार्थ्यांनी तातडीने बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल करावा, या कामासाठी परवानगी देण्यात येईल.-हेमंत केरूळकर, मुख्याधिकारी,नगरपंचायत, पालमप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पालम नगरपंचायतींतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून २ कोटी १५ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून प्रत्येक लाभार्थ्याला २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. नगरपंचायकडे आॅनलाईन आलेल्या प्रस्तावनांही तातडीने मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पालम नगरपंचायतीच्या वतीने योजनेत पात्र प्रत्येक लाभार्थ्यास घरकुल देण्याचा प्रयत्न सुरु आहे.-बालासाहेब गणेशराव रोकडे, उपनगराध्यक्ष, पालम
परभणी : नगरपंचायतीकडून ५०० घरकुलांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:18 IST