मानवत ( परभणी) : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ५४ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील वळण रस्त्यावर आज, मंगळवारी ( दि. ११ ) सकाळी ६. ३० वाजता घडली. बालासाहेब झुटे असे मृताचे नाव आहे.
शहरातील गोलाईत नगर भागात राहणारे बालासाहेब बाबासाहेब झुटे ( ५४) आज सकाळी शहरातील वळण रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत होते. यावेळी महाराणा प्रताप चौकाकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका कारने ( एमएच १४ बीआर ८६९०) झुटे यांना पाठीमागून जोराची धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, बालासाहेब झुटे हे उडून रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात पडले. तर कार देखील रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.
दरम्यान, मॉर्निग वॉक करणारे पोउनि दिगंबर पाटील, पोलीस कर्मचारी राजू इंगळे, डुकरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झुटे यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून झुटे यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी, लक्ष्मण झुटे यांच्या तक्रारीवरून निष्काळजीपणे भरधाव वेगात कार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक ज्ञानेश्वर प्रभाकर मोरे ( रा. उक्कलगाव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.