परभणी : कालपर्यंत स्वबळाची भाषा वापरणाऱ्या सर्वच पक्षांनी नगरपालिका निवडणुकीनंतर मात्र युती व आघाडीसाठी प्रयत्न चालविले आहेत. यामध्ये पुन्हा आपल्या उमेदवारीवर गंडांतर येणार की काय? या चिंतेने अनेक इच्छुकांना ग्रासले आहे.
परभणी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. जे इच्छुक आहेत ते सध्या एकीकडे पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी गळ घालत आहेत, तर सोबतच विविध कागदपत्रांची जुळवाजुळवही करीत आहेत. काही पक्षांनी तर आधी उमेदवारी देणार असल्याचे सांगून निद्रिस्त असलेल्या कार्यकर्त्यांना जागे केले. आता त्याच उमेदवाराला शांत बसायला सांगायचे कसे? असा पेच पक्षनेत्यांसमोर राहणार आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत सामाजिक व जातीय समीकरणे आखून आधीपासूनच तयारी करणाऱ्या काही धुरंदर मंडळीने आता मतविभाजनाचा मुद्दा पुढे करून युती व आघाडीचा घाट घातल्याचे दिसत आहे, तर काहींना केवळ बोलणीची औपचारिकता पूर्ण करून स्वबळ अजमावायचे आहे. अन्यथा अडचणीच्या जागा मित्रपक्षाच्या गळ्यात घालून सर्व प्रभागांत उमेदवार दिले, हे दाखविण्याचा प्रयत्न राहणार आहे.
भाजपकडून मागच्या वेळी अवघ्या ८ जागा असल्याने त्यात भरघोस वाढ करायची तर या मंडळींना एकोप्याने लढा द्यावा लागणार आहे. मागच्या वेळी सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला गतवैभव कायम ठेवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. मागच्या ३१ जागा राखणे हेच त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुरुवातीला जोर दाखविल्यानंतर पुन्हा शांततेचे धोरण अवलंबले. आता पुन्हा ही मंडळी जोर पकडत आहे. प्रभागनिहाय चाचपणी होत आहे. या पक्षाचा खासदार व आमदार असताना फक्त पाचच नगरसेवक निवडून आल्याचा कलंक पुसायचा तर अपेक्षित मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यातच शिंदेसेनेला विधानसभेला चांगले मतदान मिळाले तरी मैदान मारणारे चेहरे नव्याने जोडावे लागतील. कोरी पाटी असल्याने त्यांना जे मिळेल तो नफाच राहणार आहे.
मागच्या सभागृहात राष्ट्रवादीच्या १९ जागा होत्या. आता परिस्थिती बदलली. दोन गट पडले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने इन्कमिंगवर भर देत थेट सत्तेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला. या शहरातील सामाजिक व जातीय गणितावर काँग्रेसची मजबूत असलेली भिंत भेदण्याचा प्रयत्न आहे, तर काही जुने शिलेदार घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
युती झाली तर जागा वाटप करायचे कसे?युतीत जागा वाटप हा गंभीर मुद्दा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट पूर्ण ६५ जागांवर तयारी करीत असल्याने व त्यांनी उमेदवारीच्या भरवशावर अनेकांना पक्षप्रवेश दिल्याने इतरांशी जुळवून घेणे त्यांना सर्वांत अवघड आहे, तर भाजपच्या मागच्या वेळी ८ जागा होत्या. शिंदेसेनेला तो दावा करायलाही वाव नाही. त्यामुळे भाजपला मोठा भाऊ मानत शिंदेसेनेने त्यांना झुकते माप दिले तर हे दोघे एकत्र लढू शकतात. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही तसे संकेत दिले आहेत.
आघाडीत तर अजून गंभीर स्थितीमागच्या सभागृहात काँग्रेसची सत्ता होती. ३१ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे सर्वाधिक जागा काँग्रेसने लढविल्या तर शिवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गटाला किती वाटा द्यायचा, हा प्रश्न राहणार आहे. बऱ्याच ठिकाणी काँग्रेसच्या विद्यमानांच्या ठिकाणीच शिवसेनेकडे इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी जुना इतिहास सांगत बसली तर ७५ टक्क्यांवर जागा या दोनच पक्षांना द्याव्या लागतील. येथेही कोणत्या तरी दोन पक्षांनाच सोबतीची संधी आहे.
तडजोडीची भूमिका घेतली तर कार्यकर्ते नाराजजर एवढे करूनही युती व आघाडीसाठी नेत्यांनी तडजोड केलीच तर आतापर्यंत तयारी करणारे कार्यकर्ते नाराज होतील. मात्र, आधीच याबाबत निर्णय झाला तर कदाचित ही नाराजी कमी राहील. ऐनवेळी माघार घेण्यास सांगितले तर झालेले बंड कोणत्याच पक्षाला परवडणारे राहणार नाही. या प्रकाराने अनेकांना उमेदवारी कटण्याची धास्ती वाटत आहे.
Web Summary : Parbhani's political circles are rife with anxiety as parties explore alliances for municipal elections. Aspirants fear losing candidacy. Potential rebellion looms, further complicating the already tense situation. Seat sharing formulas pose challenges.
Web Summary : परभणी के राजनीतिक गलियारों में चिंता व्याप्त है क्योंकि पार्टियां नगरपालिका चुनावों के लिए गठबंधन तलाश रही हैं। उम्मीदवारों को उम्मीदवारी खोने का डर है। संभावित विद्रोह से पहले से ही तनावपूर्ण स्थिति और जटिल हो गई है। सीट बंटवारे के फार्मूले चुनौती पेश करते हैं।