फेब्रुवारीपासून बाजारपेठेत हरभऱ्याची आवक सुरू झाली होती. ५ फेब्रुवारीपासून खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे. २ हजार ७० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीसाठी आणावा, यासाठी १० एप्रिलपर्यंत २ हजार शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून आवाहन केले होते. यापैकी १८६ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्रावर २ हजार २२ क्विंटल हरभरा आणून विक्री केला होता. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारपेठेत हरभऱ्याच्या दरात तेजी आली होती. फेब्रुवारी महिन्यात हरभऱ्याला कमी दर मिळाला असला तरी एप्रिल महिन्यात हरभऱ्याला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र दिसून आले होते. १० एप्रिल ते १५ मे दरम्यान हरभऱ्याला ४९०० ते ५५०० रुपये दर मिळाला होता.हा दर हमीदरापेक्षा जास्त असल्याने १० एप्रिल पासून हमीभाव केंद्राकडे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. खासगी बाजारात चांगला दर मिळत असल्याने तसेच माल विक्री केल्यानंतर नगदी पैसे मिळत असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना माल विक्री करत असल्याचे चित्र एप्रिल महिन्यात दिसून आले; मात्र २० मेपासून हरभऱ्याचे दर कमी कमी होत ४ हजार ६०० रुपयांपर्यंत आल्याचेे दिसून आले. हा दर हमीभावापेक्षा ६०० रुपये कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे चित्र दिसून आले.यामुळे हमीभाव केंद्रावर बंद पडलेली खरेदी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती.खरेदी-विक्री संघानेे यासंदर्भात नाफेडकडे पाठपुरावा केला होता.नाफेडने हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार २९ मेेपासून येथील शासकीय हमीभाव केंद्रावर हरभऱ्याची खरेदी सुरू झाली असून दोन दिवसात २० शेतकऱ्यांचा १९० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. दरम्यान, हमीभाव केंद्र पुन्हा सुरू झाल्याने तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
२५ जूनपर्यंत चालणार खरेदी
कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या अगोदर शासकीय हमीभाव केंद्रावर हरभरा खरेदीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या कार्यक्रमानुसार हमीभाव केंद्रावर २५ मेपर्यंत हरभऱ्याची खरेदी करता येणार होती. केंद्रावर खरेदीची मुदत वाढवण्यात आली असून आता २५ जून पर्यंत शासकीय हमीभाव केंद्रावर खरेदी करण्यात येणार आहे.
१ कोटींची देयके अदा
१८६ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्रावर २ हजार २२ क्विंटल हरभरा आणून विक्री केला होता. हरभरा हमीभाव केंद्र विक्री केलेल्या १८६ शेतकऱ्यांपैकी १६७ शेतकऱ्यांचे ९० लाख १६ हजार ८०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात १८ एप्रिल आणि २५ एप्रिल रोजी जमा करण्यात आले होते. उर्वरित १९ शेतकऱ्यांचे १२ लाख ९५ हजार ४०० रुपये मागील आठवड्यात जमा झाले आहेत. आतापर्यंत एकूण १ कोटी ४ हजार रुपयाचे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे जमा झाली असल्याची माहिती खरेदी-विक्री संघाने दिली.
खरेदी-विक्री संघाच्या परिसरात शासकीय हमीभाव केंद्रावर २९ मे पासून आम्ही शासकीय दराने हरभरा खरेदी सुरु झाली आहे. तरी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून माल विक्रीसाठी आणण्याची सूचना दिली जात आहे.
माणिक भिसे, व्यवस्थापक खरेदी-विक्री संघ, मानवत