परभणी : ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी उभारलेल्या ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तब्बल अडीचशे पदे रिक्त असल्याने आरोग्य केंद्रांनाच रिक्त पदांचा आजार जडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात आरोग्य विभागातील क्षमता उघड्या पडल्या. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा पुरविताना अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, २५१ उपकेंद्र कार्यत आहेत. या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त आहेत. तर औषध निर्माण अधिकारी, आरोगञय सेवक, आरोग्य सहायक, पर्यवेक्षक, कुष्ठरोग तंत्रज्ञ, अवैद्यकीय पर्यवेक्षक अशी २२८ पदे रिक्त आहेत. शासन दरबारी आरोग्य विभागाकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव यांनी सहा महिन्यांपूर्वी या संदर्भात पाठपुरावा केला मात्र कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त
जिल्ह्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा द्यायची कशी? असा खरा प्रश्न निर्माण होतो. वैद्यकीय अधिकारी गट अ ची ७८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १३ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी गट ब ची ८ पदे मंजूर असून, त्यातील एक पद रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णांना जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते.
आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांसंदर्भात आरोग्य उपसंचालकांकडे पत्रव्यवहार झाला आहे. त्याचप्रमाणे इतर रिक्त पदे भरण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरूच असतो. रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही पदे लवकरच भरली जातील.
डॉ.एस.पी. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी.
आरोग्य केंद्र : ३१, उपकेंद्र : २५१
कर्मचारी संख्या
आरोग्य केंद्र : १५५, उपकेंद्र : ५८८
एकूण कर्मचारी रिक्त संख्या
आरोग्य केंद्र :१०६, उपकेंद्र : २१७