परभणी : आतापर्यंत स्वबळाचा नारा देणारे प्रमुख पक्ष आता युती वा आघाडीसाठी सर्वतोपरी प्रयत्नांची भाषा करीत आहेत. फिसकटलेच तर स्वबळाची तयारी असल्याचेही सांगत आहेत. त्यामुळे नेमका काय फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष असून तसे न झाल्यास मात्र उमेदवारांची चंगळ होणार आहे.
परभणी महापालिकेत आधीपासूनच सर्वच पक्षांकडून स्वबळ आजमावण्याची तयारी सुरू होती. मात्र, काहींना यामध्ये सत्तेपासून दूर जाण्याचा धोका वाटत आहे. समविचारी मतांचे विभाजन झाल्याचा फटका बसून विरोधी पक्षांना त्याचा फायदा होऊ शकतो, अशी धारणा आहे. त्यामुळे सगळेच जण आता स्वबळ गुंडाळून ठेवण्याच्या तयारीत आहेत. शिवाय पालिका निवडणुकीतील आर्थिक उलाढालींची मोठी चर्चा झाली. आता मनपात तर एकाच प्रभागात चारजण निवडून द्यायचे आहेत. येथेही तोच अनुभव आला तर काही उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने लढण्यापूर्वीच बाद होतील. पक्षनिधी कोण जास्त देणार? यावरूनही चर्चा रंगत आहेत. जिकडे जास्त, तिकडे गर्दी होईल. मात्र, मतदारांनाही मान्य होणारा चेहरा देणे हेच सर्व पक्षांसमोरील आव्हान आहे. युती व आघाडीबाबत ही सावध भूमिका असताना व तीन-तीन पक्षांना सोबत घेणेही सोपे नाही. त्यातच आ. रत्नाकर गुट्टे यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून शहर विकास परिवर्तन आघाडीची घोषणाही केली.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार लढूभाजप परभणीत पूर्ण ताकदीने सर्व जागा लढणार आहे. २२१ इच्छुकांचे अर्ज आले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपूडकर, महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वात सर्व १६ प्रभागांत उमेदवार देऊ. मात्र, वरिष्ठांच्या सूचनेनुसार महायुतीत एकत्र लढण्याचा प्रयत्न आहे.-सुरेश भुमरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, भाजप
सन्मानजनक जागा हव्यापरभणीत शिवसेनेला मानणारा मतदार आहे. एकनाथ शिंदे हे सर्व बहिणींचे लाडके भाऊ आहेत. शिवसेनेकडे जवळपास दोनशे इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे. युतीसाठी आम्हीसुद्धा आग्रही आहोत. परंतु, सन्मानजनक पद्धतीने युती झाली तर आम्ही युती करू.-माणिक पोंढे, महानगराध्यक्ष, शिवसेना
युतीचा निर्णय वरिष्ठच घेतीलपरभणीकरांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीकडूनच सामान्य परभणीकर महापौर देऊ असा विश्वास आहे. पूर्ण ६५ जागा लढविल्या जातील. युतीचा निर्णय वरिष्ठच घेतील. मात्र, आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भावना जाणून घेतल्या. त्यांच्या भावना वरिष्ठांना कळवू.-प्रताप देशमुख, महानगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
स्थानिक पातळीवर निर्णयकाँग्रेसने सर्व ६५ जागा स्वबळावर लढवायची तयारी केली आहे. मागच्या सभागृहातील आम्ही सत्ताधारी आहोत. सन्मानजनक तोडगा निघाला तर महाविकास आघाडी करून लढण्याचा प्रयत्न राहील. वरिष्ठांनीही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.-नदीम इनामदार, महानगराध्यक्ष, काँग्रेस
ताकदीने लढण्याचा निर्धारआजच आमच्या पक्षाची मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाली. पदाधिकारी व वरिष्ठांच्या सल्ल्याने महाविकास आघाडी अथवा स्वबळ याबाबत निर्णय घेतला जाईल. पूर्ण ताकदीने लढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे.-अजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी श.प.
अन्यथा स्वबळमनपावर शिवसेनेचा भगवा फडकावा, यासाठी जोरदार तयारी केली. खासदार संजय जाधव, आ. राहुल पाटील यांचे पाठबळ आहे. १६ प्रभागांत प्रभावी चेहरे आमच्याकडे आहेत. मात्र, वरिष्ठांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न राहील. अन्यथा स्वबळ आजमावू.-डॉ. विवेक नावंदर, महानगराध्यक्ष, उद्धवसेना
Web Summary : Parbhani's major parties prioritize alliances for the municipal elections, but are prepared to contest independently if negotiations fail. All parties are ready to fight with full strength. Senior leaders will decide on alliances.
Web Summary : परभणी के प्रमुख दल नगर निगम चुनाव के लिए गठबंधन को प्राथमिकता दे रहे हैं, लेकिन बातचीत विफल होने पर स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने के लिए तैयार हैं। सभी पार्टियाँ पूरी ताकत से लड़ने के लिए तैयार हैं। गठबंधन पर वरिष्ठ नेता निर्णय लेंगे।