परभणी : संचारबंदीचा परिणाम रोजगार हमी योजनेच्या कामांवरही झाला असून, मागील आठवड्यात केवळ ४ हजार ९९० मजुरांना काम मिळाले आहे. त्यामुळे कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागणार आहे.
मागील तीन चार आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये कामाच्या शोधात गेलेली मजूर मंडळीही आता जिल्ह्यात परतू लागली आहे. परिणामी जिल्ह्यातील मजुरांची संख्या वाढली असून, बाहेरून आलेल्या मजुरांनाही काम उपलब्ध करण्याची जबाबदारी प्रशासनावर येऊन ठेपली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा परिणाम जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांवरही झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ३४१ कामे सुरू होती. या कामांवर ४ हजार ९९० मजुरांना काम मिळाले आहे. परभणी तालुक्यात सर्वाधिक १०९ कामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यात ५७, मानवत ७४, पालम ४९ आणि सोनपेठ तालुक्यात २४ कामे सुरू आहेत. सर्वाधिक मजूर परभणी तालुक्यातील असून, १ हजार ३४७ मजुरांना तालुक्यामध्ये काम उपलब्ध झाले आहे. सध्याची निर्माण झालेली परिस्थिती पाहता, रोजगार हमीची कामे मोठ्या संख्येने वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
यंत्रणांनी फिरविली पाठ‘मागेल त्याला काम’ देण्याच्या उद्देशाने रोजगार हमी योजनेची स्थापना झाली. परंतु, प्रत्यक्षात शासकीय यंत्रणांनी या कामांकडे पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात वन विभागाचे एक, सामाजिक वनीकरणाचे चार, रेशीम विभागाचे नऊ कामे वगळता एकाही विभागाने काम उपलब्ध करून दिले नाही. यंत्रणांकडून केवळ १४ कामे सुरू होती. जिल्ह्यातील मजुरांसह बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांसाठी काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता यंत्रणांवर येऊन ठेपली आहे.
ग्रामपंचायतींची ३२७ कामेग्रामपंचायतींनी मात्र स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध केली आहेत. सार्वजनिक विहिरी, वैयक्तिक विहिरी, सार्वजनिक वृक्ष लागवड, घरकुल, आदी कामे ग्रामीण भागात सुरू आहेत. वैयक्तिक विहिरींची २७३ कामे केली जात आहेत, तर सार्वजनिक विहिरींची २४ कामे सध्या सुरू आहेत. घरकुलांच्या २७ कामांवरही मजूर उपस्थित आहेत.