गंगाखेड तालुक्यामध्ये गाव, तांडे, वाडे यांची संख्या १०४ एवढी आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या ६ असून या केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीपासून लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, सद्य:स्थितीत ४ महिन्यांत उपजिल्हा रुग्णालयांतर्गत शहरातील ४ हजार १९९ जणांनी लस घेतली आहे. तर, ग्रामीण भागात ६ आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ५ हजार ६४१ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये धारासुर केंद्रात ८९०, कोद्री केंद्रांतर्गत १ हजार ८५६, महातपुरी केंद्रांतर्गत ९९२, पिंपळदरी केंद्रांतर्गत १ हजार २६३, तर राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७४० ग्रामस्थांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे १६ जानेवारी ते आतापर्यंत म्हणजे चार महिन्यांत केवळ शहर व तालुक्यातील १० हजार १२९ जणांनीच लस घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने लस घेण्याबाबत नागरिकांमध्ये अद्यापही पुरेशी जनजागृती करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.
४ महिन्यांत केवळ १० हजार जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST