परभणी : मानवत तालुक्यातील रामपुरी या गावाच्या दिशेने जाणाऱ्या एका कारमधून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने २१ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास १ लाख १५ हजार ५३० रुपयांची देश आणि विदेशी दारू जप्त केली आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना पोखर्णी येथून रामपुरीकडे जाणाऱ्या एका कारमध्ये दारूचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिरसेवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत जक्केवाड, कर्मचारी मोबीन, दिलावर, अजहर, सानप आदींनी २१ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रामपुरी फाट्यापासून १ किलोमीटर अंतरावर सापळा लावला. यावेळी रामपुरी गावाकडे येणाऱ्या कारला थांबविले; तेव्हा या कारमध्ये ६० हजार ४८० रुपयांची देशी दारू आणि ५५ हजार ५० रुपयांची विदेशी दारू आढळली. पोलिसांनी देशी दारूच्या १००८ आणि विदेशी दारूच्या ३५१ बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच ८० हजार रुपयांची कारही या कारवाईत जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी बाळासाहेब तूपसमिंद्रे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामदेव मारोतराव मुळे व मोहम्मद इमाम हुसेन (दोघे रा. पोखर्णी) यांच्याविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.