लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : भरधाव वेगातील रिक्षा पलटी झाल्याने साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना दि. २१ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मरडसगाव पाटीजवळील चाटोरी रस्त्यावर घडली. तालुक्यातील बडवणी येथील आप्पाराव मुंजा सावंत (६०) हे त्यांची पत्नी जिजाबाई व अन्य एकजण असे तिघे शुक्रवार, दि. २१ मे रोजी दुपारी प्रवासी रिक्षाने चाटोरी येथून गंगाखेडकडे येत असताना, दुपारी तीनच्या सुमारास भरधाव वेगातील रिक्षा मरडसगाव पाटीजवळील चाटोरी रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात आप्पाराव मुंजा सावंत (६०) यांच्या डोक्याला, हाताला, पायाला मार लागल्याने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देशमुख, डॉ. गुणवंत जगतकर, परिचारिका सुमेधा नागरगोजे, सीता अंभोरे यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून परभणी येथे नेण्यास सांगितले. मात्र, परभणी येथे नेत असताना रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या पायाला व रिक्षाचालक मंगेश भिसे याच्या हाताला मार लागून ते जखमी झाले आहेत. सावंत यांचे शवविच्छेदन २२ मे रोजी सकाळी करण्यात आले. याप्रकरणी २२ मे रोजी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.