गंगाखेड (जि. परभणी ) : महावितरण शहर कार्यालयाच्या लगत असलेल्या विद्युत उपकेंद्रामधील रोहित्रातील ऑईल गळतीमुळे आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजता घडली. दरम्यान या घटनेने शहरातील महात्मा फुले नगर, सारडा कॉलनी, ओम नगर आदी परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. परभणीच्या तांत्रिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी गंगाखेडला तातडीने रवाना झाले आहेत.
सोमवारी सकाळी १०:३० वाजता महावितरणचे शहर कार्यालय असलेल्या परिसरात उपकेंद्र आहे. सोमवारी सकाळी ऑईल गळतीमुळे सुरुवातीला किरकोळ असलेल्या आगीने नंतर भीषण स्वरूप घेतले. अडगळीच्या ठिकाणी पावर स्टेशन असल्याने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. महावितरणचे स्थानिक अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच परभणी महावितरण कार्यालयाचे तांत्रिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी गंगा कडकडे तातडीने रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली.
शहराच्या निम्म्या भागाचा विद्युत पुरवठा बंद या घटनेने महात्मा फुले नगर, सारडा कॉलनी, ओम नगर, शिवशक्ती नगर तसेच रेल्वे पटरी वरील बहुतांश भागात परिणाम झाला. या परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाला. असून परभणीच्या तांत्रिक विभागाकडून आग आटोक्यात आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे समजते.