परभणी : कोरोनानंतर उद्भवलेल्या म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात चार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या आजारावरील उपचाराची दिशा निश्चित झाली आहे.
कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात या आजाराचे पाच रुग्ण सध्या निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीचा आजार असून अतिशय गुंतागुंतीचा असल्याने या आजारावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांतील तज्ज्ञांची गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून आल्यास त्या रुग्णास तातडीने संबंधित तज्ज्ञांकडून उपचार मिळणे आवश्यक आहे. यासाठी कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट अशा वैद्यकीय तज्ज्ञांची आवश्यकता भासते.
जिल्ह्यात काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसत आहेत. या रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार होण्यासाठी एका वैद्यकीय पथकाची आवश्यकता होती. त्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनी २० मे रोजी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले आहे. या पथकात डॉ. बी.एस. मुंडे हे पथक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. त्याचप्रमाणे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. रहेमत आलम, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. किशोर नाईक, दंतरोग तज्ज्ञ डॉ. फेरोज इक्बाल यांचा समावेश करण्यात आला आहे.
म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्यानंतर संबंधित रुग्णांची तपासणी करणे, या रुग्णांना आवश्यक असलेला औषधोपचार करणे आणि रुग्णांच्या नोंदी घेण्याचे काम या पथकावर सोपविण्यात आले आहे. जिल्ह्यात पथकाची नियुक्ती झाल्यामुळे आता म्युकरमायकोसिसच्या आजारात रुग्णांवर उपचार करण्याची दिशाही निश्चित झाली आहे.
पथकप्रमुख घेणार निर्णय
म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्यास गंभीर आजाराच्या रुग्णांना एम्फोटेरेसिन हे इंजेक्शन द्यावे लागते. कोणत्या रुग्णांना हे इंजेक्शन द्यावयाचे आहे, याबाबतचा निर्णय पथक प्रमुख घेणार असून, त्यांच्या सल्ल्यानुसारच आणि परवानगीने रुग्णांना हे इंजेक्शन द्यावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
उपचारासाठी स्वतंत्र कक्ष
कोरोनातून बरे झाल्यानंतर किंवा कोरोना आजारावर उपचार सुरू असतानाच काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळत आहेत. हे रुग्ण कोरोनावर उपचार घेतात. म्युकरमायकोसिसची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर स्वतंत्र वॉर्डात उपचार करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीनेही प्रशासनाने तयारी केली असून, जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानव विकास इमारतीत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.