परभणी : अनलॉकच्या प्रक्रियेत जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या टप्प्यात असल्याने या टप्प्यातील दिल्या जाणाऱ्या सुविधेनुसार जिल्ह्यात अनलॉकचे कसे आदेश निघतात, याकडे लक्ष लागले आहे. रविवारी यासंदर्भात स्थानिक पातळीवर आदेश येण्याची शक्यता आहे.
पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडच्या प्रमाणानुसार अनलॉकचे ५ टप्पे तयार करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ७.२ टक्के असून, भरलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी १६.२ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या टप्प्यात झाला आहे.
सध्या शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन आहे. त्यापूर्वी चार दिवस संपूर्ण बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय झाला होता. दुसऱ्या टप्प्यातही बऱ्याच सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. रविवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन असल्याने सोमवारपासून कशा पद्धतीने निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये बाजारपेठेतील दुकाने निश्चित केलेल्या वेळेनुसार सुरू करण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे हॉटेल्स, चित्रपटगृहे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न सोहळे, जीम, सलून, ब्युटीपार्लर या सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू करता येतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या सेवांबाबत जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
काय सुरू राहील?
अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या सेवा नियमित सुरू.
बाजारपेठेतील दुकानांना निश्चित केलेल्या वेळेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी.
बांधकाम, कृषी कामे खुली.
जीम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू.
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेने मिळू शकते परवानगी.
लग्न सोहळ्यांसाठी मॅरेज हॉल, मंगल कार्यालयांना ५० टक्के आणि जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीला परवानगी.
शासकीय बससेवा आसन क्षमता १०० टक्के सुरू.
काय बंद राहील?
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता भासणार नाही. मात्र, रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात जाण्यास किंवा येण्यास पास लागेल.
जिल्ह्यात ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स सुरू करण्यास मिळू शकते परवानगी.
मॉल्स, चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची मुभा.
मीटिंग, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थिती.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन खाटा यानुसार ठरविलेल्या शासनाच्या निकषानुसार निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यातील ऑक्सिजन खाटांचा निकष पाहता जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या टप्यात होऊ शकतो. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार अनलॉकबाबत निर्णय घेतला जाईल.
-दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी