या संदर्भात खा. बंडू जाधव म्हणाले की, जिल्हा कचेरीत पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परभणी येथील एमआयडीसी भागातील खासगी प्लांटला चाकण येथून लिक्विड ऑक्सिजन मिळत होते. ते बदलून कर्नाटकातील बेल्लारी येथून देण्यात आले. संबंधितास चाकण येथूनच लिक्विड ऑक्सिजन द्यावे किंवा हैदराबाद येथून पुरवठा करावा. परभणीपासून बेल्लारीचे अंतर अधिक आहे. त्यामुळे टँकर परभणीत येण्यास अधिक वेळ लागेल, असे सांगत होतो. या अनुषंगाने आ. सुरेश वरपूडकर हे बोलत असताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांचा गैरसमज झाला. त्यामुळे ते वरपूडकर यांना बोलण्यापासून थांबवत होते. त्यावेळी आपण आ. वरपूडकर यांना बोलू द्या, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही टार्गेट करतोय, असा गैरसमज झाला. त्यामुळे ते पुन्हा बोलत असताना त्यांना आम्हाला बोलू द्यायचे नसेल तर बैठकीला बोलावले कशाला? असा सवाल केला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांशी आपला कसलाही वाद झालेला नसून चांगला समन्वय आहे, असे खा. जाधव म्हणाले.
पालकमंत्र्यांशी कोणताही वाद नाही : जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST