परभणी : तक्रारदाराच्या भावाने स्वच्छता सेवेसाठी कोटेशन तत्वावर निविदा भरली होती. ही निविदा मंजूर करण्यास पालम ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ५० हजारांची लाच मागणी केली होती. बुधवारी पालम ग्रामीण रुग्णालय परिसरात झालेल्या सापळा कारवाईत आरोपी लोकसेवक डॉ.रमेश खंदारे यांनी पंचासमक्ष ४० हजारांची लाच स्वीकारली. ही कारवाई नांदेड आणि परभणी एसीबीच्या पथकाने संयुक्तरित्या केली.
डॉ.रमेश दगडोबा खंदारे (४९, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी, अतिरिक्त पदभार वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पालम) असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांनी २ एप्रिलला एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यांच्या भावाच्या नावाने असलेल्या फर्मचे कामकाज तक्रारदार पाहतात. या फर्ममार्फत २७ मार्चला तक्रारदार यांच्या भावाने ग्रामीण रुग्णालय पालम येथील स्वच्छता सेवेसाठी कोटेशन तत्त्वावर निविदा भरली होती.
ही निविदा मंजूर करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.रमेश खंदारे यांनी ५० हजारांची लाच मागणी केल्याची तक्रार दिली होती. बुधवारी नांदेड, परभणीच्या एसीबी पथकाने ग्रामीण रुग्णालय परिसरात लाच मागणी पडताळणी केली.
पंचासमक्ष निविदा मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती ४० हजारांची मागणी केली. त्यानुसार मंजूर आदेश डॉ.रमेश खंदारे यांनी तक्रारदार यांना देऊन लाच रक्कम लगेच घेऊन येण्यास सांगितले. सापळा कारवाईत पंचासमक्ष ४० हजाराची लाच स्वीकारली.
डॉ.खंदारे यांच्या अंगझडतीमध्ये रोख रक्कम दोन हजार १२० रुपये, एक मोबाईल व चारचाकी वाहनात १५ हजार मिळून आले. आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पालम ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे. ही सापळा कारवाई पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब थोरे यांनी केली.
Web Summary : A medical superintendent in Parbhani was arrested for accepting a 40,000 rupee bribe. He demanded the money to approve a sanitation service tender. ACB officers laid a trap and caught him accepting the bribe in Palam.
Web Summary : परभणी में एक चिकित्सा अधीक्षक को 40,000 रुपये की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। उन्होंने स्वच्छता सेवा निविदा को मंजूरी देने के लिए पैसे की मांग की थी। एसीबी अधिकारियों ने जाल बिछाकर उसे पालम में रिश्वत लेते हुए पकड़ा।