परभणी येथील शेख तस्लीम शेख अर्शद यांचे ८ डिसेंबर २०१८ रोजी तुराबुल हक नगर भागातील शेख अर्शद शेख मसूद यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस चांगले नांदविल्यानंतर सासरच्या मंडळींकडून त्यांना लग्नात तुझ्या वडिलांनी कमी हुंडा दिला. साहित्य दिले नाही, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर २७ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना मुलगी झाल्यानंतर तुझ्या वडिलांचे घर मुलीच्या नावावर कर म्हणून त्रास देण्यास सुरूवात केली. त्यास शेख तस्लीम यांनी नकार दिल्यानंतर २२ जुलै २०२१ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या घरी त्यांना विषारी द्रव्य पाजवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना उलटी झाली. सासरच्या मंडळींच्या तावडीतून सुटका करून घेत त्यांनी त्यांच्या भावाला फोन केला. त्यांनी शेख तस्लीम यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असताना त्यांनी २२ जुलै रोजी कोतवाली पोलिसांना याबाबत तक्रार दिली. त्यावरून पती शेख अर्शद, सासू शमीम सुलताना, जेठ शेख मुजाहेद, दीर शेख उबेद, परवीन सुलताना, हाश्मी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
विवाहितेस विषारी द्रव्य पाजले ; सहा जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST