जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला असून, मागील काही दिवसांपासून ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण केले जात आहे. या लसीकरणासाठी अनेकवेळा अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी लसीकरणापूर्वी प्रत्येक नागरिकाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते. या आदेशामुळे अनेक जणांनी चाचणी असेल तर लस नको, अशी भूमिका घेत लसीकरण केंद्रावरून काढता पाय घेतला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला. रविवारी विनाचाचणी लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला. शहरातील ९ केंद्रांवर लसीकरण सत्र सुरू करण्यात आले. मात्र याचदरम्यान केंद्र शासनाच्या स्वास्थ्य एवम परिवार कल्याण विभागाचे सचिव राजेश भूषण यांचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले. कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना १२ ते १६ आठवड्यानंतर दुसरा डोस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी ६ ते ८ आठवड्यांनी दुसरा डोस दिला जात होता. त्यामुळे अनेक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर दाखल झाले; परंतु शासनाच्या निर्देशानुसार या नागरिकांना लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशीही अनेकांना लस न घेताच परतावे लागले. जिल्ह्यात उपलब्ध लसींच्या ३० टक्के लस पहिल्या डोससाठी आणि ७० टक्के लस दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवली आहे. त्यामुळे रविवारी केवळ फेब्रुवारी महिन्यात ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना दुसरा डोसचे लसीकरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे शहरातील अनेक केंद्रांवर रविवारी ही शुकशुकाट दिसून आला.
केंद्राच्या पत्रामुळे अनेक जण डोस न घेताच परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST