परभणी : शहरातील नानलपेठ परिसरातील एका घरामध्ये घरगुती गॅस लिकेज झाल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. वेळीच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शहरातील बाल विद्या मंदिर शाळेच्या बाजुला भानुदास डुकरे यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडर लिकेज झाल्यामुळे आग लागली. आगीची घटना शेख चांद शेख इब्राहिम यांनी स्वतः दूचाकीवर येऊन अग्निशमन कार्यालयामध्ये कळविले.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरातील आगीवर नियंत्रण मिळवले. तर एका जवानाने लिकेज गॅस सिलेंडर घराबाहेर मोकळ्या हवेच्या ठिकाणी आणला. त्यामुळे आग वाढली नाही आणि पुढील मोठी दुर्घटना टळली.
आगीत स्वयंपाक घरातील साहित्य जळाले. त्यामध्ये नुकसान काही झाले नाही. आयुक्त धैर्यशील जाधव, सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या नियंत्रणात प्र.अग्निशमन केंद्र अधिकारी डी. यू. राठोड. यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक जवान उमेश कदम, सर्जेराव मुंढे, अक्षय पांढरे, वाहन चालक समी सिद्धिकी यांनी आग आटोक्यात आणली.