काढणीच्या कामात शेतकरी मग्न
परभणी : जिल्ह्यात रबी हंगामातील पिके काढणीला आली आहेत. ग्रामीण भागांमध्ये ही कामे वेगाने सुरू आहेत. गहू, ज्वारी या पिकांची काढणी सध्या सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये मजुरांची टंचाई असल्याने शेतकरी कुटुंब या कामात मग्न असल्याचे दिसत आहे.
स्थानकासाठी पर्यायी जागेची मागणी
परभणी : शहरातील बसस्थानक परिसरात बसपोर्ट उभारणीचे काम सुरू असल्याने प्रवाशांसाठी ही जागा अपुरी पडत आहे. तेव्हा बसस्थानकासाठी नवीन पर्यायी जागा निवडावी व त्याठिकाणी प्रवाशांसाठी स्थानकाची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. सध्या संचारबंदीमुळे बससेवा बंद असून, या काळात नव्या जागेचा शोध घेतल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकते.
शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात
परभणी : वाहतूक सुरळीत करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी महानगरपालिकेने शहरात बसविलेली सिग्नल यंत्रणा सध्या धूळ खात पडून आहे. लाखो रुपयांची ही यंत्रणा वापरात नसल्याने प्रशासनाला नुकसान सहन करावे लागत आहे. मागच्या काही वर्षांपासून शहरातील वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. ही बाब लक्षात घेता सिग्नल्स सुरू करावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे.
शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची गर्दी
परभणी : येथील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १०० टक्के कर्मचारी उपस्थित राहत असल्याने गर्दी होत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढला असून, शासनाने शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत ५० टक्के कर्मचारी उपस्थिती बंधनकारक केली असताना स्थानिक पातळीवर मात्र या आदेशाला बगल दिली जात आहे.
कर वसुलीला कोरोनाचा फटका
परभणी : शहरातील नागरिकांकडे मनपाचा मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर थकलेला आहे. हा कर वसूल करण्यासाठी प्रशासनाने कराच्या शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत दिली असतानाही कर भरण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून, प्रशासनाने संचारबंदीही जाहीर केली आहे. त्यामुळे कराची वसुली ठप्प आहे.