महावितरणमधील वीज कामगार, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगार २४ तास सेवा देतात. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अखंडित वीजपुरवठा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून मान्यता द्यावी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, कोविडने मृत्यू झालेल्या वीज कामगारांना ५० लाख रुपयांचे अनुदान द्यावे, तीनही कंपन्यांतील एमडी इंडिया या जुन्याच टीपीएची तत्काळ नियुक्ती करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
शहरातील जिंतूर रोडवरील महावितरणच्या सर्कल कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला. या आंदोलनात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटना, आदी सहा संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. सोमवारी पार पडलेल्या आंदोलनात पंकज पतंगे, सचिन मोगल, सुजाता प्रधान, सुरेश लुटे, शे. शामशू, रवी गायकवाड, अमोल चव्हाळ, अशोक कच्छवे, अभय ढेबरे, संकेत इसपुरे, आदींसह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.