परभणी : शहरातील लोकमान्य नगर भागात बुधवारी दुपारी भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर दुपारी फिर्यादी कुटुंबीय घरी परतले असता ही चोरीची बाब उघडकीस आली. यामध्ये घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि काही रोकड चोरट्यांनी लांबविली आहे.
रवींद्र राऊत यांचे कुटुंबीय लोकमान्य नगर भागात वास्तव्यास आहे. वांगी येथे त्यांचे शेत असून गावातील धार्मिक कार्यक्रमास रवींद्र राऊत आणि त्यांचे कुटुंबीय बुधवारी सकाळी घराला कुलूप लावून गेले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना घरामध्ये चोरी झाल्याची बाब लक्षात आली. यानंतर त्यांनी घटनेची माहिती नवा मोंढा पोलीस ठाण्याला दिली. घटनास्थळी नवा मोंढा पोलीस पथक, फिंगरप्रिंट आणि श्वानपथक दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता.
श्वान टायसनने काढला मागपोलीस दलाच्या बीडीडीएस पथकातील श्वान टायसन हे डॉग हँडलर यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. श्वानाने घरातून रस्त्यापर्यंत माग काढला. चोरी झालेल्या घराच्या परिसरात एका सीसीटीव्हीत तीन जण दुचाकीवर आले होते. याच तिघांनी चोरी केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. या इसमांनी दुचाकी लावलेल्या जागेपर्यंत श्वान टायसन पोहोचले होते. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी रोकड असा लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे समजते. परिसरातील नागरिक तसेच रितेश जैन, सोनु लाहोटी, बबलू टाक यांच्यासह युवकांनी चोरी झालेल्या ठिकाणी धाव घेतली व मदतकार्य केले.