राजन मंगरूळकर, परभणी : जिल्हाभरात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पाऊस शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कायम होता. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडात झालेल्या या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील काही रस्त्यांची वाहतूक प्रभावित झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सकाळपासूनच झालेल्या जोरदार पावसामुळे शासकीय कार्यालयासह विविध ठिकाणच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांची पावसाने चांगलीच धांदल उडाली. परभणी शहरात गुरुवारी मध्यरात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली यासह ग्रामीण भागात सुद्धा हा पाऊस सुरू होता. शुक्रवारी सकाळी दोन ते तीन तास जोराचा पाऊस शहरी तसेच ग्रामीण भागात होता या पावसामुळे परभणीतील वसमत रोड मार्गावर पाणीच पाणी साचले होते तर ग्रामीण भागातील काही प्रश्न सुद्धा वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. ढगांच्या गडगडाटात हा पाऊस मोठ्या स्वरूपात झाला. यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सकाळी शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयात जाणाऱ्या अधिकारी कर्मचारी, विद्यार्थ्यांना गैरसोईला सामोरे जावे लागले.
पूर्णा - झिरो फाटा रस्ता बंद
रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे पूर्णा- झिरो फाटा रस्ता बंद झाला आहे. यासह विविध गावांमध्ये ग्रामीण भागातील नदी नाल्यांना पूर आल्याची स्थिती या पावसाने निर्माण झाली आहे.