परभणी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील शेळगाव व पाथरी तालुक्यांतील कासापुरी महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानंतर शुक्रवारी पाथरी व गंगाखेड तालुक्यांत पुन्हा शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एक तास मुसळधार पाऊस झाला. परभणी शहरातही ८ वाजेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी १० नंतर पाऊस थांबला. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. पूर्णा तालुक्यातील गौर व परिसरात मात्र सकाळी ९.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास एक तास हा पाऊस बरसला.
पुढील सहा दिवसही पावसाची शक्यता
जिल्ह्यात पुढील सहाही दिवस पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट या हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थेने वर्तविली आहे. त्यामुळे यावर्षी मृगाचा प्रारंभ पावसाने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.