सेलू : तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींपैकी ६७ ग्रा.पं.ची निवडणूक १५ जानेवारी रोजी झाली. ८ ते १२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यामुळे ६७ गावांचे कारभारी ठरले आहेत.
तालुक्यात सरपंचपदाची ५५ ठिकाणी, तर उपसरपंचपदाची ५६ ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. काही ठिकाणी मात्र एका सदस्याचा बहुमताचा आकडा एका सदस्यावर येऊन ठेपल्याने निवडणूक झाल्याने पॅनलप्रमुखाने लावलेल्या फिल्डिंगमुळे मोठे उलटफेर झाले नाहीत. तालुक्यातील गिरगाव बु. येथे सरपंचपदी सोनाली ताटे, तर उपसरपंचपदी ललिता फाटे, गुळखंड सरपंचपदी चित्रलेखा जावळे, तर उपसरपंचपदी शेख इसाबी अजीज, पिंपरी बु.- सिंगठाळा येथील सरपंचपदी आशाताई निकाळजे, तर उपसरपंचपदी नागाबाई सुर्वे, भांगापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा राऊत, तर उपसरपंचपदी सीता बोडखे आदींची निवड झाली आहे.