दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या वर्षीही या जयंती सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली. मात्र कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याने जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने कुठेही गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत जयंती साजरी करण्यात आली.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आ.सुरेश वरपुडकर, आ.डॉ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेसचे सिद्धार्थ हत्तीअंबिरे, मनपा आयुक्त देविदास पवार, विजय वाकोडे, डी.एन. दाभाडे, सिद्धार्थ भालेराव, रवी सोनकांबळे, गौतम मुंडे, विजय गायकवाड, डॉ. विवेक नावंदर, बाळासाहेब गोडबोले, अमोल गायकवाड आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरातील विविध भागांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने प्रबोधनाचे कार्यक्रम पार पाडले. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले.
रुग्णवाहिकेला दिला रस्ता
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात बुधवारी सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम सुरू असतानाच एक रुग्णवाहिका या मार्गाने जात होती. यावेळी सामाजिक भान राखत सर्व पदाधिकारी आणि युवकांनी या रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी रस्ता करून दिला.