- प्रमोद साळवेगंगाखेड : सध्या पाकिस्तान सोबत असलेल्या युद्ध स्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील माजी सैनिकांनी पुन्हा सीमेवर जाण्याची इच्छा व्यक्त करत दंड थोपटले आहेत. सरकारने संधी दिल्यास पाकिस्तानला नेस्तनाबूत करू अशी डरकाळी फोडत या माजी सैनिकांनी आम्हाला पुन्हा सैन्यात घ्यावे अशा मागणीचे निवेदन बुधवारी तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना सादर केले आहे.
काश्मीर मधील पहेलगाम परिसरात पाकिस्तानी आतंकवाद्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केली. या घटनेने भारतभर संताप व्यक्त केला. या घटनेचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने आज, बुधवारी पहाटे पाकिस्तानवर जोरदार हवाई हल्ला केला. या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमेचे रक्षण केलेल्या निवृत्त सुभेदार व माजी सैनिकांनी भारताच्या जोरदार हल्ल्याचे स्वागत केले. तसेच नेहमीच कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला कायमची अद्दल घडविण्यासाठी आणि भारत मातेच्या रक्षणासाठी पुन्हा धावून जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सीमेवर जाण्याची पुन्हा संधी द्यावी. देश रक्षणासाठी पुन्हा नव्या दमाने शत्रूवर चाल करून जाऊ, असा निर्धार गंगाखेड तालुक्यातील निवृत्त सुभेदार विश्वनाथ सातपुते, काशिनाथ पौळ, माणिक बडवणे व मारुती सूर्यवंशी या व्यक्त केला.
सैनिकांच्या संख्येत गंगाखेड तालुका अव्वलगंगाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सैनिकांची संख्या आहे. अनेकजण मातृभूमीची सेवा करून आले तर अनेकजण आजही देशसेवेत आहेत. तालुक्यात जवळपास १००० ते ११०० आजी- माजी सैनिकांची असल्याची माहिती निवृत्त सुभेदार विश्वनाथ सातपुते यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. गंगाखेड तालुक्यातील आजी- माजी सैनिकांची मोठे संघटन असून देशावर आलेल्या प्रत्येक चांगल्या- वाईट घटनेत सैनिक व सैनिकांचे कुटुंबीय हिरीरीने एकत्र येतात.
सैनिकांचं गाव 'बडवणी'तालुक्यातील बडवणी या गावास सैनिकांचे गाव म्हणून अनेक वर्षांपासून ओळख आहे. एकट्या बडवणी गावात सुमारे ४०० आजी- माजी सैनिक आहेत. देश रक्षणासाठी बडवणी गावातील मातापित्यांनी आपले सुपूत्र देश रक्षणासाठी समर्पित केले आहेत ही अभिमानास्पद बाब आहे.