गंगाखेड रस्त्याच्या कामाने घेतला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:16+5:302021-03-07T04:16:16+5:30
बाजारपेठ भागात गर्दी कायम परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी बाजारपेठेतील गर्दी अजूनही हटलेली नाही. त्यामुळे फिजिकल ...
बाजारपेठ भागात गर्दी कायम
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी बाजारपेठेतील गर्दी अजूनही हटलेली नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. मनपा प्रशासन मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत असले तरी फिजिकल डिस्टन्स संदर्भात मात्र कारवाई होताना दिसत नाही.
वसमत रोडवरील वाहतूक धोकादायकच
परभणी : वसमत रस्त्यावर असोला पाटी ते झिरो फाटा या दरम्यानची वाहतूक धोकादायक बनत आहे. या मार्गावर रस्ता निर्मितीचे काम सुरू असून, एका बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक याच अरुंद रस्त्यावरून केली जात आहे. शिवाय उखडलेल्या गिट्टीमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
स्टेडियम समोरील ढापा गायब
परभणी : येथील जिल्हा स्टेडियमच्या प्रवेशद्वार समोरच नालीवरील ढापा गायब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. अनेक वेळा खड्डा लक्षात न आल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने ढापा बसवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत
परभणी : शहरात अजूनही पाणीपुरवठ्याचे नियोजन सुरळीत झाले नाही. नागरिकांना आठ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता किमान चार दिवसाआड पाणी देण्यात नियोजन मनपाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
गुटख्याची खुलेआम विक्री
परभणी : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची जिल्ह्यात खुलेआम विक्री होत आहे. मध्यंतरी पोलीस प्रशासनाने अवैध गुटखा विक्रीविरुद्ध कारवाई सुरू केल्याने या विक्रीला काहीसा आळा बसला होता. मात्र ही मोहीम बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा विक्री सुरू वाढली आहे. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
वाळू अभावी बांधकाम व्यवसाय अडचणीत
परभणी : जिल्ह्यात वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत चढ्या दराने वाळूची विक्री होत असल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. हा व्यवसाय जवळपास ठप्प झाला असून, मुजरांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे.
स्थानकावर कोरोना चाचण्यांना फाटा
परभणी : जिल्ह्यातील एकाही बसस्थानकावर प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात नाही. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र महामंडळ प्रशासनाने अद्याप या चाचण्या करण्याची सुविधा निर्माण केली नाही. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे नागरिक विनाचाचणी शहरात प्रवेश करीत आहे.