बोरी येथील शेतकऱ्यांना परमिटचे वाटप
बोरी : जिंतूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने बोरी परिसरातील शेतकऱ्यांना नुकतेच परमिटचे वाटप करण्यात आले. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमधून निवड झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर बियाण्यांसाठी हे परमिट वाटप करण्यात आले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व गळीत धान्य तेल अभियान अंतर्गत शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे, मंडल कृषी अधिकारी सातपुते, एस. बी. अडकिने, कृषी पर्यवेक्षक राजेश मानवते यांची उपस्थिती होती.
पाथरीत सहा दुकानांवर गुन्हे दाखल
पाथरी : शहरातील बाजारपेठेत निर्बंध घालून दिलेल्या वेळेनंतरही व्यवसाय करणाऱ्या सहा दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. २ जून रोजी पाथरी पेालिसांनी दुपारी दोन वाजेनंतर शहरात गस्त घातली. या दरम्यान, दुपारी २ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान, वेगवेगळी सहा दुकाने नियम मोडून व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. यावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले. वेगवेगळ्या सहा गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.