पालम (जि. परभणी) : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने पालम शहरात खळबळ उडाली आहे.
पालम गंगाखेड रोडवरील शिवनेरी कॉलेजजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे एटीएम आहे. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे ४ च्या दरम्यान चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम तोडून आतील जवळपास १८ लाख ६० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी पुढे आली. घटनेची माहिती कळताच पालम ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, स्थागुशाचे पोनि विवेकानंद पाटील यांनी पाहणी केली. या घटनेच्या अनुषंगाने योग्य तो तपास करण्याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. पालम पोलिस ठाण्यामध्ये रविवारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी पोलिस अधीक्षकांनी पथके स्थापन केली आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या कलरचा मारला स्प्रेएटीएम फोडण्याअगोदर चोरट्यांनी प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या कलरचा स्प्रे मारल्याचे निदर्शनात आढळून आले. दरम्यान, एटीएम फोडण्याच्या एक दिवस अगोदर एटीएममध्ये २५ लाख रुपयांची रक्कम भरण्यात आली होती, अशी विश्वसनीय माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली; परंतु चोरट्यांनी किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही, याचा तपास चालू आहे.