बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव गायके येथे सुरेश सोपानराव बादाड यांचे शेत आहे. गट क्रमांक २१३ मध्ये त्यांनी ज्वारीचे पीक घेतले होते. या ज्वारीच्या ३ हजार ५०० पेंढ्याची वळई शेतातच करून ठेवली होती. ३० मार्च रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास या वळईला आग लागली. आगीची माहिती कळताच शेत शेजाऱ्यांनी आग विझविण्यासाठी एकच धावपळ केली. परिसरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तोपर्यंत वळईतील संपूर्ण कडबा तसेच १५ टीन पत्रे, दोन औताचे खोड, तिफन आणि बैलगाडी जळून खाक झाली. या घटनेत साधारणत: १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सुरेश बादाड यांनी बोरी पोलीस ठाण्याला अर्ज देऊन आगीच्या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली.
दरम्यान, अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.