परभणी : निवडणूक विषयक कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच आचारसंहिता भंगाबाबतचे गुन्हे तात्काळ दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी दिले.जिंतूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील पोलिस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, आचारसंहिता पथक, भरारी पथक, सनियंत्रण पथकांच्या कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, उपविभागीय अधिकारी पी.एस.बोरगावकर, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा कोषागार अधिकारी अभय चौधरी यांच्यासह सनियंत्रण कक्षाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी एस.पी.सिंह म्हणाले, फ्लार्इंगस्कॉडचे कार्य पूर्णपणे पोलिस स्वरुपाचे असून याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. निवडणूक काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी बारकाईने वाहन तपासणी करावी, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याकडे संबंधित पथकाने लक्ष द्यावे, अवैध दारु विक्री तसेच मोठ्या रक्कमांच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवावी, संवेदनशील मतदान केंद्राच्या गावामध्ये विविध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी तसेच धार्मिक ठिकाणी उमेदवारांना कोणत्याही पद्धतीने प्रचार करता येणार नाही. जातीय तेढ निर्माण होतील असे भाषण करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश एस.पी.सिंह यांनी दिले. उपविभागीय अधिकारी पी.एस.बोरगावकर म्हणाले, जिंतूर विधानसभा मतदारसंघात विविध सनियंत्रण कक्षाची स्थापना आली आहे. तसेच खर्च सनियंत्रण अंतर्गतही पथके कार्यरत आहेत. याबाबतच्या सर्व निर्देशांची अंमलबजावणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
आचारसंहिता भंग करणाऱ्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा-सिंह
By admin | Updated: September 28, 2014 23:52 IST