परभणी : रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या दरामध्ये गोणीमागे ७०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांवर खत दरवाढीचा भार पडणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने १ लाख ५४ हजार २०० मेट्रिक टन खताची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी १ लाख १७ हजार ८८८ मेट्रिक टन खत जिल्ह्याला मंजूर झाले आहे.
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हा हंगाम आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. सन २०१७ - १८पासून दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी शासन, प्रशासनाकडून उभारी देणे गरजेचे असतानाच रासायनिक खताच्या किमतीमध्ये कंपन्यांनी भरमसाठ वाढ केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दरवर्षी जवळपास ५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले जाते. त्यासाठी आगामी खरीप हंगामात वेगवेगळ्या रासायनिक ९० मेट्रिक टन खतांची गरज जिल्ह्याला भासणार आहे. अशा परिस्थितीमध्ये रासायनिक कंपन्यांनी खताच्या किमती वाढविल्याने बळीराजा हैराण झाला आहे. डीएपी १२०० रुपये प्रतिगोण मिळणारी आता १९०० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यावर्षी प्रत्येकी गोणीमागे ७०० रुपये जास्तीचे माेजावे लागणार आहेत. तर दुसरीकडे १०:२६:२६ खताची ११७० रुपयांना मिळणारी गोण आता १७७५ रुपयांवर पोहोचली आहे. १२:३२:१६ खताची ११८४ रुपयांना मिळणारी गोण आता १८०० रुपयांना खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आगामी खरीप हंगामाचे नियोजन करून १ लाख ५४ हजार २५४ मेट्रिक टन खताची मागणी लातूर येथील विभागीय सहसंचालक कृषी कार्यालयाकडे नोंदविली आहे. त्यानुसार या कार्यालयाने १६ एप्रिलपर्यंत १ लाख १७ हजार ८८० मेट्रिक टन खत मंजूर केला आहे.
१३८४ मेट्रिक टन खताची विक्री
शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांसह आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्ह्यातील कृषी दुकानांतून १६ एप्रिलपर्यंत १ हजार ३८४ मेट्रिक टन खत खरेदी केले आहे. त्यामुळे १४ हजार ६५० मेट्रिक टन खत हे मागील हंगामातील शिल्लक आहे. सद्यस्थितीत ३८ हजार ९१० मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले आहे. त्यातून १ हजार ३८४ मेट्रिक टन खत विक्री झाले असून, १६ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ३७ हजार ५२६ मेट्रिक टन खत शिल्लक आहे.