पुलाच्या कामाला कंत्राटदाराने दिली गती
परभणी : गंगाखेड रस्त्यावर पिंगळगड नाल्याजवळ पूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून या पुलाची दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये हा पूलही नव्याने उभारला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर होण्याची आशा आहे.
रस्ता उखडल्याने वाहनधारकांची गैरसोय
परभणी : येथील अक्षदा मंगल कार्यालयासमोरील रस्ता उखडला असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या भागात काही महिन्यांपूर्वी अर्धवट रस्ता तयार करण्यात आला होता. त्यामुळे अर्ध्या भागापर्यंत रस्ता चांगला असून, अर्ध्या भागात मात्र खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. सध्या या परिसरात कोरोना सेंटर सुरू केल्याने वर्दळ वाढली आहे.
निधीअभावी विकासकामे ठप्प
परभणी : शहरासह जिल्ह्यातील विकासकामे निधीअभावी ठप्प आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे विकासकामांसाठी निधी प्राप्त झाला नाही. हा संसर्ग कमी झाल्यानंतर दोन महिन्यांच्या काळात विकासकामांसाठी हालचाली सुरू झाल्या; परंतु त्यानंतरही पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रस्ते, नाली यासह इतर विकासकामे ठप्प आहेत.
भाजीपाला विक्रेते आर्थिक संकटात
परभणी : मागच्या दोन महिन्यांपासून आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला विक्रेते आर्थिक संकटात आले आहेत. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामानंतर भाजीपाला उत्पादनावर भर दिला होता; परंतु संचारबंदीमुळे व कोरोनाच्या संकटामुळे उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
शहरातील चौकांची दुरवस्था
परभणी : शहरात मागच्या काही दिवसांपासून चौकांची दुरवस्था झाली आहे. चौक सुशोभीकरणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, अनेक भागात चौक परिसरात मोडतोड झाल्याचे दिसून येत आहे. ग्रँड कॉर्नर तसेच अपना कॉर्नर येथील चौकांची अवस्था वाईट आहे. मनपा प्रशासनाने चौक सुशोभीकरणासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.