परभणी : कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ११० अर्ज दाखल झाले आहेत. सोशल मीडियावर फिरत असलेला हा मॅसेज बनावट असल्याने या अर्जांवर आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.
कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा बनावट मॅसेज सोशल मीडियावर फिरत आहे. त्या आधारावरुन येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकांनी अर्ज केले आहेत. मात्र, मॅसेज बनावट असल्याने या अर्जांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
आपत्ती व्यवस्थापनाकडे आले ११० अर्ज
कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी मागील जून महिन्यापासून येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ११० अर्ज दाखल झाले आहेत. २०१५ च्या पत्राचा संदर्भ देऊन हे अर्ज करण्यात आले आहेत. मात्र, अशा पद्धतीच्या मदतीचे प्रशासनाला कोणतेही निर्देश नाहीत.
या अर्जांचे काय करणार?
कोरोना काळात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, यासाठी प्रशासनाकडे दाखल केलेले अर्ज स्वीकारण्यात आले खरे. मात्र, अशा मदतीचे निर्देश नसल्याने कोणतीही कारवाई झालेली नाही.
काय आहे बनावट मेसेज
एनडीआरएफचे २०१५ चे पत्र सोशल मीडियावर फिरत आहे. त्यात आपत्ती व्यवस्थापनमधून ४ लाख रुपयांची मदत दिली जात असल्याचे म्हटले आहे.
अर्ज करू नका, अशी कुठलीही योजना नाही !
कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांसाठी मदतीची कोणतीही योजना नाही, तसेच राज्यस्तरावर तशा पद्धतीचे आदेशही नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करू नयेत.