मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. बुधवारी मात्र वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे, अनेक भागांमध्ये रात्रभर हा पाऊस बरसला. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव मंडळात १०७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यामध्ये एकूण चार मंडळ असून सरासरी ५८.९ मिमी पाऊस झाला आहे. पाथरी तालुक्यात चारही मंडळात बुधवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कासापुरी मंडळांमध्ये ८२ मिमी पाऊस झाला आहे. तर हादगाव मंडळात ४० मिमी पावसाची नोंद झाली. सोनपेठ आणि पाथरी तालुक्यातील दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १७ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात परभणी तालुक्यामध्ये १०.५, गंगाखेड १२.७, पाथरी : पात्री ४०.८, जिंतूर ५.७, पूर्णा : ५.५, पालम ८.२, सेलू १४, सोनपेठ ५८.९ आणि मानवत तालुक्यात ३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मान्सूनपूर्व या पावसाने शेती मशागतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले. तसेच सेलू, गंगाखेड या भागात वीज खांब कोसळून नुकसान झाले आहे.