परभणी : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोनाच्या धोकादायक जिल्ह्यांच्या यादीत परभणी जिल्ह्याचा समावेश नसल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर, शहरातील लघू व्यावसायिकांचा संयम सुटला असून, बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठ वगळता, इतर भागांत हॉटेल्स, गॅरेज, झेरॉक्स सेंटर आदी दुकाने सुरू करण्यात आली. प्रशासनाकडेही याकडे कानाडोळा केला.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. या अंतर्गत किराणा आणि फळ-भाजीचे दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. या आदेशानुसार, आतापर्यंत बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. इतर व्यवहारही ठप्प होते. आदेश डावलून व्यवहार केल्यास पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संबंधित व्यावसायिकाविरुद्ध दंडात्मक कारवाईचा धडाकाही लावला होता.
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी झाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा संसर्ग वाढलेला आहे, तेथेच कडक लॉकडाऊन लावण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले असून, या जिल्ह्यांची यादीही जाहीर केली आहे. त्यात परभणी जिल्ह्याचे नाव नसल्याने, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि बुधवारी शहरातील वसमत रोड, कारेगाव रोड, जिल्हा स्टेडियम यांसह इतर भागांतील किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली. वसमत रस्त्यावरील वॉशिंग सेंटर, दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेज, झेरॉक्स सेंटर्स, चहा विक्रीची काही हॉटेल्स, जिल्हा स्टेडियम परिसरातही हॉटेल्स, केशकर्तनालय, पुस्तक विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी अर्धे शटर उघडून, तर काहींनी खुलेआम व्यवसायाला प्रारंभ केला. प्रशासनानेही याकडे कानाडोळा करीत कारवाईचा बडगा उगारला नाही. मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठ बंद असल्याने लघू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. व्यवसायातून उत्पन्न मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, दुकानाचे भाडे, वीज मीटरचा किराया, बँकांच्या कर्जाचे हप्ते थकले असून, आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बुधवारी मात्र धोकादायक जिल्ह्यांच्या यादीत परभणी जिल्ह्याचे नाव नसल्याचे समजताच, या किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने सुरू करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला.
मुख्य बाजारपेठ मात्र कडकडीत बंद
येथील शिवाजी चौक, गुजरी बाजार, कच्छी बाजार, नानलपेठ, गांधी पार्क हा भाग मुख्य बाजारपेठेचा भाग आहे. या भागात मात्र सकाळपासूनच दुकाने कडकडीत बंद असल्याचे पाहावयास मिळाले. सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजी विक्री झाली. त्यानंतर मात्र, दिवसभर या भागात शुकशकाट होता. बंद दुकानांसमोर व्यापारी, त्यांच्याकडील कामगार उभे राहून व्यवसाय करता येतो का, याची काणकूण घेत होते. मात्र, या भागातील परवानगी नसलेल्या इतर व्यावसायिकांनी दुकाने उघडली नाहीत.
शिवाजी चौकात पोलीस बंदोबस्त
बुधवारीही शिवाजी चौक परिसरात पोलीस बंदोबस्त कायम होता. या भागातील चारही रस्त्यांवर पोलीस कर्मचारी उपस्थित होते, शिवाय बाजारपेठ भागातही फिरून दुकान सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जात होती.