‘ग्रामसडक योजनेची चौकशी करा’
गंगाखेड : तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र बहुतांश ठिकाणी कामात अनियमितता आढळून येत आहे. त्यामुळे चौकशी करावी, अशी मागणी भांबरवाडी, मुळीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी
परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी महानगरपालिकेने चौकाचौकात सिग्नल बसविले होते. सध्या सिग्नल बंद असल्याने केवळ ते शोभेचे झाले आहेत. शहरातील वाढलेली वाहतूक लक्षात घेता, सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी आहे.
दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय
पिंगळी : बलसा ते मिरखेल या रस्त्यावर बांधकाम विभागाच्या वतीने दिशादर्शक फलक बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नवीन वाहनधारकांना रहदारी करण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुळे मजुरांची उपासमार
देवगावफाटा : कोरोनामुळे सध्या सेलू तालुक्यातील बांधकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या मजुरांना शासनाने मदत करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.