परभणी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेचे संपर्कमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी कल्याण नगर भागातील आयएमएहॉल येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला. व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख विवेक नावंदर, माजी आमदार मीराताई रेंगे पाटील, सखुबाई लटपटे, मंगल कतले, संजय सारणीकर, दीपक बारहाते, अर्जुन सामाले यांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या सुरुवातीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
शंभूराजे देसाई म्हणाले, कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या वतीने सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून मदतीचे कार्य करण्यात आले. यामध्ये मोफत धान्य वाटप, मोफत भोजन तसेच औषधोपचार यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले. परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. राज्य शासनाने व शिवसेनेने केलेल्या विविध योजनांचा प्रसार जिल्ह्यातील तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिवसैनिकांनी संपर्क अभियानात घर तेथे शिवसैनिक व गाव तिथे शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत. लेटर पॅडपुरते पद घेऊ नका, या पदाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा करता येईल, याचा विचार करून पक्षाची भूमिका नागरिकांसमोर मांडा, असे ते म्हणाले. यावेळी खासदार संजय जाधव, जिल्हाप्रमुख विशाल कदम, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पंढरीनाथ धोंडगे यांनी केले. मेळाव्यास उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
जिल्हाप्रमुखांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊ
शिवसंपर्क अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या मेळाव्यास शिवसेनेचे एक जिल्हाप्रमुख अनुपस्थित होते. याबाबत खासदार संजय जाधव यांनी जिंलाहाप्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत वक्तव्य केल्यानंतर शंभूराजे देसाई यांनी बोलताना जिल्हाप्रमुखांच्या अनुपस्थितीची नोंद घेतली जाईल. ते नेमके का अनूपस्थित होते, याचे कारण लक्षात घेऊन याबाबतचा अहवाल पक्षाकडे सादर केला जाईल, असे ते म्हणाले.