खरीप पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने शुक्रवारी सेलू येथे जिंतूर व सेलू तालुक्यांतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, तहसीलदार मांडवगडे, लीड बँकेचे अधिकारी हट्टेकर, प्राचार्य शरद कुलकर्णी, गटविकास अधिकारी मोरे, अहिरे, नायब तहसीलदार थारकर, देवडे, आदींची उपस्थिती होती. यावेळी आ. बोर्डीकर म्हणाल्या की, गतवर्षी बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. शिवाय अतिवृष्टीचाही शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. अशात गतवर्षीचा त्यांना पिक विमा मिळालेला नाही. त्यामुळे ते अडचणीत आहेत. त्यामुळे पीक कर्जासाठी त्यांची कोणीही अडवणूक करू नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीत दोन्ही तालुक्यांतील पीक कर्जासह विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. पीक कर्जासाठी मागील वर्षाप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, अशा सक्त सूचना यावेळी आ. बोर्डीकर यांनी दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पीक कर्ज सुलभ पद्धतीने वाटप करण्याबाबत संबंधिताना सूचना दिल्या.
पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करू नका : बोर्डीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST