परभणी : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या धान्याचा लाभ घेण्यासाठी जून महिन्यात तब्बल ८ हजार ७७७ नागरिकांनी चक्क दुकानदार बदलून सोयीच्या दुकानदारांकडून धान्य उचलले आहे.
रेशनचे दुकान घरापासून दूर असल्यास किंवा काही कारणास्तव एका ठिकाणाहून घर दुसऱ्या ठिकाणी बदलले असल्यास त्या लाभार्थीची रेशनच्या धान्यासाठी गैरसोय होऊ नये या उद्देशाने राज्यात पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या रेशन दुकानातून रेशनचे धान्य मिळण्यास अडचण होत असेल तर चक्क तो दुकानदार बदलून सोयीच्या दुकानातून धान्य घेतले जात आहे.
जिल्ह्यात ८ हजार ७७७ नागरिकांनी जुलै महिन्यात पोर्टेबिलिटी केली असून, या एकाच महिन्यात ९ हजार ८४८ ट्रान्झेक्शन करीत धान्य उपलब्ध करून घेतले आहे. रेशन दुकानदारांविरुद्ध सातत्याने तक्रारी होतात. त्यामुळे नागरिकांनी देखील चक्क दुकानदारच बदलून हक्काचे रेशनचे धान्य मिळवून घेतले आहे.
शहरात जास्त बदल
ग्रामीण भागात शासकीय योजनांची माहिती पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे पोर्टेबिलिटीचा लाभ घेणाऱ्यांची संख्याही शहरातच अधिक आहे.
जुलै महिन्यात परभणी तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ८७१ नागरिकांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे.
नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
कोरोनाच्या संसर्गामुळे रेशन दुकानांवरून गोरगरीब नागरिकांना मोफत धान्याचे वितरण केेले जात आहे.
नोव्हेंबरपर्यंत गहू आणि तांदूळ मोफत वितरित केले जाणार असून, आतापर्यंत ४ लाख ५० हजार कार्डधारकांनी लाभ घेतला आहे.
मजुरांची गैरसोय दूर
जिल्ह्यात रेशनकार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ कार्डधारक घेत आहेत. त्यामुळे गावातीलच दुकानदार बदलून स्वत:चे कार्ड इतर दुकानांना जोडले जात आहे किंवा कामानिमित्त मजुरांचे स्थलांतर झाले तर स्थलांतराच्या जागी देखील पोर्टेबिलिटी करून धान्य मिळविता येत आहे.