कोरोनाचा संसर्ग मागील दोन आठवड्यांपासून कमी झाला असून, रुग्णांची संख्याही घटली आहे. मात्र, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांपेक्षाही अधिक असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. १९ मे रोजी आरोग्य विभागाला ५ हजार १९४ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ४ हजार ८२१ अहवाल निगेटिव्ह असून, ३६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तो बुधवारी ६.९ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ९२ झाली असून त्यापैकी ४३ हजार २६१ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १६५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या २ हजार ६६६ रुग्ण उपचार घेत आहेत.
वाढत्या मृत्यूने चिंता कायम
कोरोना संसर्ग घटला असला तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूने जिल्हावासीयांची चिंता कायम आहे. बुधवारी १२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात ४, आयटीआय हॉस्पिटलमध्ये २, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २ आणि खासगी रुग्णालयात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ७ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.
४३६ रुग्णांची कोरोनावर मात
बुधवारी दिवसभरात ४३६ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना सुट्टी देण्यात आली. मागील आठवडाभरापासून बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.